जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा | पंचारति ओंवाळू श्रीपति तुज भक्तिभावा || धृ || विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून | घृतयुत्क शर्करामिश्रींत गोधूमचूर्ण | प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण || १ || शातानंदविप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें | दरिद्र दवडुनि अंती त्यातें मोक्षपदा नेलें || त्यापासूनि हे व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें | भावार्थे पूजितां सर्वा इच्छित लाधलें || २ || साधुवैश्यें संततिसाठी तुजला प्रार्थियलें | इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें | त्या पापानें संकटी पडुनी दु:खहि भोगिलें | स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उध्दरिलें || ३ || प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली | क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली | अंगध्वजराजाची यापरि दु:खस्थिती आली | मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसली || ४ || पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणी | पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं | अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि | ऐका भक्तां संकटि पावसि तुं चक्रापाणी || ५ || अनन्यभावे पूजुनि हें व्रत जे जन आचरति | इच्छित पुरविसी त्यातें देउनि संतति संपत्ती | संहरती भवदुरितें सर्वहि बंधने तुटती | राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती || ६ || ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णू मी कैसा || भक्तीपुरस्सर आचरति त्यां पावसि जगदीशा | भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तुं सर्वेशा | मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा || जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा || ७ ||
मराठी
-
-
आरती तुकारामा
आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा | सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ || राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले | तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ || तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें | म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||
-
श्री हनुमंताचीआरती
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं | कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१|| जय देव जय देव जय श्रीहनुमंता तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ||धृ|| दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मनिला खेद | कडाडिले पर्वत उड़गण उच्छेद | रामी रामदास शक्तीचा शोध ||2|| जय देव जय देव जय श्रीहनुमंता ||
-
श्री पांडुरंगाचीआरती
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥ येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ २ ॥ येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ ३ ॥ येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ असो नसो भाव आम्हां तुझिया ठायांकृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ ४ ॥
-
श्री विठोबाचीआरती
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्या शोभा | पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जागा ||१|| जय देव जय देव पांडुरंग रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ||धृ|| तुळसीमाळा गळां कर ठेवुनी कटी | कसे पितांबर कस्तुरी लल्लाटी | देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढें उभे राहती || जय देव जय देव पांडुरंग ||२ || धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा | सुवर्णाची कमळे वनमाळा गळां | राई रखुमाबाई राणीया सकळा | ओवाळिती राजा विठोबा सावळा | जय देव जय देव पांडुरंग ||३|| ओवाळूं आरत्या कुर्वंड्या येती | चंद्रभागेमाजी सोडुनिया देती | दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महिमा वर्णावा किती || जय देव जय देव पांडुरंग ||४|| आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती केशवासी नामदेव भावें ओवाळिती जय देव जय देव पांडुरंग ||५||
-
श्री दत्ताचीआरती
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता हा जाणा | त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा | नेती नेती शब्द नये अनुमाना | सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ||१|| जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीतां हरिली भवचिंता ||धृ|| सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त | अभ्याग्याशी कैंची कळेल हि मात | पराही परतली तेथें कैचा हेत | जन्ममरणाचा पुरलासे अंत ||२|| जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | दत्त येउनिया उभा ठाकला | सद्भावें साष्टांगे प्रणिपात केला | प्रसन्ना होऊनी आशीर्वाद दिधला | जन्ममरणाचा फेरा चुकविला ||३|| जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता दत्त दत्त ऐसें लागले ध्यान | हरपलें मन झालें उन्मन | मीतुं पणाची झाली बोळवण | एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ||४|| जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता
-
श्री शंकराचीआरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला । लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मल वाहे झुळझुळां ।। जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।१।। कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभूतीचे उधळण शीत कंठ निळां ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।२।। देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें । त्यामाजी अवचित हलाहल जें उठिलें । ते त्वां असुरपणे प्रशान केलें । नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें || जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।३।। व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी । शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रघुकुळटिळक रामदास अंतरीं ।। जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।४।।
-
श्री दुर्गादेवीचीआरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी । वारी वारी जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।। जय देवी जय देवी महिषासुरमथनी । सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।। जय देवी जय देवी ।। धृ० ।। त्रिभुवन भुवनी पहाता तुज ऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही । ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।। २ ।। प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा । अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा । नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।।
-
शेंदुर लाल चढ़ायो
शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको। दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको। हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको। महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥ १॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥ अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि। विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी। कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी। गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ॥२॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ भावभगत से कोई शरणागत आवे। संतत संपत सबही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे। गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
-
श्री गणपतीचीआरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।…